google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आरोग्य व शिक्षण

माझी शाळा, माझा स्वाभिमान’ उपक्रमांतर्गत शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

चंद्रपूर, दि. 30 : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आदिवासी विकास विभाग आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी शाळा, माझा स्वाभिमान’ हा उपक्रम नागपूर विभागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

 

या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 1 ते 4 थी साठी Teaching at the Right Level ही पद्धत, इयत्ता 5 ते 7 वी साठी तिचा विस्तारित वापर आणि इयत्ता 8 ते 12 वी साठी कृतीशील धडानियोजन आधारित अध्यापन पद्धती राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर व चिमूर प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमधील उच्च माध्यमिक स्तरावर इंग्रजी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय, चंद्रपूर येथे नुकतेच करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराला सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) श्री. बोंगीरवार, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या मास्टर ट्रेनर सरस्वती राय, शिक्षामित्र अमोल सातारकर उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांची चाचणी कशी घ्यावी, त्यानंतर त्यांच्या शैक्षणिक गटांची रचना कशी करावी, आणि त्या गटांनुसार अध्यापन कसे करावे, यावर सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. Teaching at the Right Level ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रगतीशी निगडित असून, तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध प्रात्यक्षिके आणि गतीविधींच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये बेसिक इंग्रजी बोलण्याची आवड व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षकांना विशेष कौशल्ये शिकवण्यात आली. यात सर्व शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. प्रशिक्षणातून मिळालेल्या नव्या माहितीचा प्रभावी उपयोग आपल्या वर्गामध्ये करण्याची शिक्षकांनी तयारी दर्शवली.

‘माझी शाळा, माझा स्वाभिमान’ या उपक्रमामुळे चंद्रपूर आणि चिमूर प्रकल्पातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा निश्चितच उंचावेल, तसेच शिक्षकांना नव्या अध्यापन कौशल्यांची जाण मिळेल, असा विश्वास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी व्यक्त केला.

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button