google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आरोग्य व शिक्षण

एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी भव्य ‘रेड रन मॅरेथॉन’ संपन्न

 चंद्रपुरातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर, दि. 29 : एचआयव्ही/एड्स विषयक जनजागृतीसाठी आज जिल्ह्यात भव्य रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली.

जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या स्पर्धेचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार आणि क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली.

युवक गटामध्ये भूषण आस्वले यांनी प्रथम क्रमांक, साईनाथ पुंगाटी यांनी द्वितीय क्रमांक व रोशन नैताम यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर युवती गटात श्रद्धा थोरात प्रथम, साक्षी पोलोजवार द्वितीय आणि आचल कडुकर तृतीय क्रमांकाने विजयी ठरल्या.

विजेत्यांना शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यापैकी निवडक स्पर्धकांना 12 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रेड रन मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याचे श्री. पानगंटीवार यांनी सांगितले.

स्पर्धेचे मुख्यगुणलेखक म्हणून रोशन भुजाडे, दर्शन माशीरकर, भुमेश्वर कन्नमवार यांचे योगदान लाभले. पंच म्हणून आदर्श चिवंडे, नावेद खान, सौरभ कन्नाके व ऋतिक धोडरे यांनी काम पाहिले.

स्पर्धेचे संचालन जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरूळकर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संकल्प बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था, नोबल शिक्षण संस्था, पॅन इंडिया आणि क्रॉईस्ट हॉस्पिटल सोसायटी यांचा मोलाचा सहभाग लाभला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button