MAHAGENCO मध्ये हजारो कोटींच्या डी.पी.आर. कामां मागे गैरव्यवहाराचा संशय?
संचालकांची भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

मुंबई/ चंद्रपूर:- महानिर्मिती (MAHAGENCO) मधील एका वरिष्ठ संचालकांच्या कार्यकाळात राज्यातील विविध औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये काढण्यात आलेल्या हजारो कोटी रुपयांच्या डी.पी.आर. (Detail Project Report) कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या कामांची प्रत्यक्ष गरज नसतानाही काही ठराविक कंत्राटदारांना लाभ मिळावा म्हणून ही कामे काढण्यात आल्याचा आरोप होत असून, त्यामुळे सार्वजनिक पैशांचा अपव्यय झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर, कोराडी, खारपखेडा, पारस, भुसावळ आणि परळी या औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर डी.पी.आर. कामे मंजूर करण्यात आली. या कामांमुळे महानिर्मितीला नेमका किती फायदा झाला, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे.
दरम्यान, काही विद्युत संचांमध्ये वेळेवर दुरुस्ती न झाल्याने उत्पादन बंद राहिले आणि त्यामुळे कंपनीला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची चर्चा आहे. खारपखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ५, चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ८ आणि ९ या संचांमध्ये झालेल्या बिघाडामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचेही सांगितले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून काही ठराविक कंत्राटदारांना कामे मिळवून दिली का? तसेच त्यांच्या कार्यकाळात प्रचंड संपत्ती कशी वाढली? याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच एका सामाजिक संघटने तर्फे या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये सर्व कामांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची संपत्तीची सखोल तपासणी व्हावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये संबंधित संचालकांचा कार्यकाळ संपत असल्याने, त्याआधी झालेल्या सर्व कामांची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

