google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

‘सेवा संकल्प’ अंतर्गत सीईओ यांच्या विविध गावांना भेटी

ग्रामपंचायत, तलाव, अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळांची पाहणी

चंद्रपूर, दि. 09 : ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी चंद्रपूर व पोंभुर्णा तालुक्यांतील विविध गावांना भेटी देऊन ग्रामपंचायत कार्यालये, अंगणवाडी केंद्रे, जिल्हा परिषद शाळा तसेच तलावांची प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामीण भागातील शासकीय योजनांची अंमलबजावणी, नागरिकांना मिळणाऱ्या सेवा-सुविधा आणि विकासकामांचा सखोल आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

 

 

या दौऱ्यात आंबेधानोरा, देवाडा खुर्द, सातारा, गिलबिली, आसेगाव आणि जुनोना या गावांना भेटी देण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयांचे कामकाज, उपलब्ध पायाभूत सुविधा, अंगणवाडी केंद्रांची स्थिती, शाळांमधील शैक्षणिक व भौतिक सुविधा तसेच नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या शासकीय सेवांचा आढावा घेण्यात आला. विविध विभागांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यात आली.

 

पाणीटंचाई टाळण्यासाठी पाणी बचतीचे आवाहन : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी विविध तलावांची पाहणी करून उपलब्ध पाणीसाठ्याची स्थिती जाणून घेतली. भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पाण्याची बचत करणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

ग्रामस्थांशी थेट संवाद; समस्या सोडविण्याचे निर्देश : भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि स्थानिक गरजा जाणून घेतल्या. गावातील सार्वजनिक सुविधांमध्ये सुधारणा करणे, उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करणे आणि नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देणे यावर त्यांनी भर दिला. पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी व उणिवा दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन सुधारणा करण्याचे निर्देशही दिले.

 

गावपातळीवरील प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न : ‘सेवा संकल्प’ कार्यक्रमांतर्गत केवळ कार्यालयीन बैठका व कागदोपत्री आढाव्यापुरते मर्यादित न राहता अधिकारी प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन शासकीय सेवा, पायाभूत सुविधा, पाणी उपलब्धता आणि विकासकामांची स्थिती जाणून घेत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांनीही जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांतील गावांना भेटी देऊन आपल्या विभागाच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

Share
Back to top button