चंद्रपूरमध्ये गोवंश तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५७ जनावरांची सुटका
३५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत

चंद्रपूर : गोवंशीय जनावरांची अवैध व क्रूरपणे वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १८ चाकी ट्रेलर ट्रकमधून अत्यंत अमानुष पद्धतीने वाहतूक करण्यात येणाऱ्या ५७ गोवंशीय जनावरांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, या क्रूर वाहतुकीत ९ जनावरांचा मृत्यू झाला असून, उर्वरित ४८ जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, एकूण ३५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजयपूर परिसरात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचून १८ चाकी ट्रेलर ट्रक अडवला. ट्रकमध्ये एकूण ५७ गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीवाटीने कोंबून, आखूड दोराने बांधून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
विशेष म्हणजे, जनावरांसाठी ट्रकमध्ये चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. अमानुष वाहतुकीमुळे ९ जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी उर्वरित ४८ जनावरांची सुटका करून त्यांच्या उपचार व देखभालीसाठी तातडीने प्यार फाउंडेशन, पडोली येथे दाखल केले.
एका आरोपीला अटक, तिघे फरार
या प्रकरणात पोलिसांनी नईमुद्दीन करिमद्दीन शेख (वय ४०, रा. घुग्घुस, ता. जि. चंद्रपूर) याला अटक केली आहे. तर इम्रान शेख, इर्शाद खान आणि मोहम्मद साकिब मोहम्मद शकूर (तिघेही रा. मूर्तिजापूर, जि. अकोला) हे आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
३५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी या कारवाईत ३० लाख रुपये किमतीचा ट्रेलर ट्रक, ५ लाख ७० हजार रुपये किमतीची ५७ गोवंशीय जनावरे आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण ३५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम (सुधारित) २०१५ तसेच भारतीय न्याय संहितेतील (BNS) लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी उपविभागाच्या पथकाने केली.

