google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

सावली वनपरिक्षेत्रात दहशत निर्माण करणारा वाघ जेरबंद

 ३०×३० चौरस फुटांच्या विशेष पिंजऱ्याचा वापर

चंद्रपूर। सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्रांतर्गत सामदा, निलसनी, पेडगाव, सोनापूर आणि वाघोली-बुटी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या ६ वर्षीय वयाचा T-122 या वाघाला अखेर जेरबंद करण्यात चंद्रपूर वन विभागाच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. या वाघाच्या हल्ल्यांत तीन गुराख्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. वाघ जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

 

 

नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने २७ सप्टेंबर २०२६ पासून विशेष मोहीम सुरू केली होती. वाघाला पकडण्यासाठी ३० × ३० चौरस फुटांच्या विशेष पिंजऱ्याचा वापर करण्यात आला. मोठ्या आणि हिंस्त्र वन्यप्राण्यांना जेरबंद करण्यासाठी विशेष नियोजन, आधुनिक देखरेख यंत्रणा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर विशेष पिंजऱ्याची संकल्पना व रचना चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नागयमकर आणि ब्रह्मपुरी विभागाचे वन्यजीवशास्त्रज्ञ राकेश अहुजा यांनी तयार केल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

मुख्य वनसंरक्षक रामानुजम आणि विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक वनसंरक्षक विकास तरसे तसेच सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, ट्रॅप कॅमेरे आणि लाईव्ह कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला. तसेच ५० ते ६० वनकर्मचारी व मजुरांनी २४ तास देखरेख ठेवत मोहिमेत सहभाग घेतला.

 

या मोहिमेत ईको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडूजी धोतरे, मानद वन्यजीव रक्षक मुकेश भांडकर, वन्यजीवशास्त्रज्ञ अक्षय नारनवरे, क्षेत्र सहाय्यक मारुती पुल्लेवाड, शूटर प्रदीप कोडापे, संबंधित वनरक्षक आणि इतर वन कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सेवानिवृत्त पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. बोनकर यांनीही वन विभागाला सहकार्य केले. याशिवाय STPF पथक मूल, RRU पथक चंद्रपूर आणि PRT चमू यांनी संयुक्तपणे काम केले.

विशेष पिंजरा, आधुनिक देखरेख यंत्रणा आणि विविध पथकांमधील समन्वयामुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचे वन विभागाने म्हटले आहे. या कारवाईमुळे सावली वनपरिक्षेत्रातील संबंधित गावांमध्ये निर्माण झालेली भीती कमी होण्यास मदत होणार असून, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Share
Back to top button