google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

भद्रावतीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट! पोलिस प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

भद्रावती (प्रतिनिधी) :भद्रावती शहरासह संपूर्ण तालुक्यात अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला असून, यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवैध दारूविक्री, गांजा सेवन व विक्री, एमडीसारख्या अमली पदार्थांचा संशयित व्यवहार, जुगार, मटका आणि वेश्या व्यवसायासारखे प्रकार उघडपणे सुरू असल्याचा आरोप करत भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अय्युबभाई कच्छी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाकडे हे धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.

 

भद्रावतीतील नागमंदिर परिसरात सकाळपासून सायंकाळपर्यंत खर्रा खाणाऱ्यांमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असून, शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिसरात गांजा सेवन करणाऱ्यांची दहशत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

 

 

गांधी चौक, मुलींची शाळा ते जामा मशीद चौक परिसरातील काही वर्दळीच्या मार्गांवर खुलेआम सट्टा-मटका सुरू असल्याचा आरोप आहे. तसेच शहरातील मुख्य बाजारपेठ, जयसवाल देशी दारू दुकान परिसर आणि बाळासाहेब चौकातील पेट्रोल पंपाजवळील काही भागांत अवैध देशी दारूची वाहतूक व विक्री होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होण्याची भीती व्यक्त केली जात असून, अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध रेती वाहतुकीचाही तालुक्यात प्रश्न गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, दि. ९ ऑगस्ट रोजी तेलवासा रोडवर झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा उल्लेख करत अशा घटनांना आळा घालण्यासाठी वाहतुकीच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.भद्रावती शहर व तालुक्यातील अवैध धंद्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात गस्त वाढवावी, अमली पदार्थांची विक्री व सेवन रोखावे आणि अवैध दारूविक्री, जुगार तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण आणावे.
शहरात वाढती गुन्हेगारी लक्षात घेता भद्रावती चे मध्यभागी आंबेडकर चौक ते गांधी चौक पर्यंत पोलीस चौकी ऊभारने अत्यंत आवश्यक आहे.यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल.
अश्या मागण्यांचे निवेदन भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

आता या गंभीर तक्रारींची पोलीस प्रशासन कितपत दखल घेते आणि प्रत्यक्षात कोणती कारवाई करते, याकडे भद्रावतीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तक्रारीचे निवेदन भद्रावती पोलीस स्टेशनचे डी. वाय. एस. पि. श्री. सचिन खेत्रे साहेब यांना देतेवेळी फोरमचे पदाधिकारी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री. विनोद गेडाम, तालुका अध्यक्ष श्री. नागेंद्र चटपल्लीवार, तालुका उपाध्यक्ष श्री. सुनील रामटेके, शहर अध्यक्ष श्री. सरफराज खान पठाण, शहर उपाध्यक्ष श्री. जितेंद्र गुलाणी उपस्थित होते.
जनहितासाठी भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चा एल्गार…..

Share
Back to top button