विना रॉयल्टी रेतीसह १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

भद्रावती (प्रतिनिधी) – भद्रावती-वरोरा मार्गावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टाटा ४०७ वाहनावर भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी टाटा ४०७ वाहनासह विना रॉयल्टी रेती असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश मुसावात हा आपल्या ताब्यातील टाटा ४०७ या वाहनातून विनापरवाना, विना रॉयल्टी वाळू/रेतीची अवैध वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
गस्ती दरम्यान संशयास्पदरित्या जात असलेले सदर वाहन पोलिसांनी थांबवून त्याची तपासणी केली असता, वाहनात रॉयल्टी पावतीशिवाय रेतीची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ वाहन ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपी उमेश मुसावात याच्याविरुद्ध भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व अवैध गौण खनिज वाहतूक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या कारवाईमुळे अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले असून, अशाच प्रकारे अवैध धंद्यांवर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

