अमली पदार्थांच्या वाहतूक, विक्री व साठवणुकीवर कठोर कारवाई करा
जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे निर्देश

चंद्रपूर, दि. 30 : जिल्ह्यात अमली पदार्थांची वाहतूक, विक्री व साठवणूक होणार नाही, यासाठी पोलिस विभागाने अधिक दक्ष राहून कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.
अमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी विविध विभागांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी उपस्थित होते. पुढे जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करावी. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अमली पदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री अथवा सेवन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित संस्थांनी तत्काळ पोलिस विभागाशी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष लक्ष द्यावे.
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे अनधिकृत उत्पादन होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. तसेच बंद अवस्थेत असलेल्या कारखान्यांचीही नियमित तपासणी करण्यात यावी. अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर्सना अचानक भेटी देऊन तपासणी करावी आणि प्रतिबंधित औषधे अथवा ड्रग्जची बेकायदेशीर विक्री होत नसल्याची खात्री करावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या आंतरराज्य सीमेलगतच्या भागात शेतीमध्ये खसखस किंवा गांजासारख्या प्रतिबंधित पिकांची लागवड होणार नाही, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे. संशयास्पद लागवड आढळल्यास संबंधित विभागांना तत्काळ माहिती देऊन आवश्यक कारवाई करण्यात यावी. टपाल, खासगी कुरिअर सेवा तसेच इतर माध्यमांतून येणाऱ्या संशयास्पद पार्सलवरही विशेष लक्ष ठेवण्यात यावे. पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचा संशय अथवा साठा आढळून आल्यास त्याची माहिती तातडीने पोलीस विभागाला द्यावी. खासगी वाहनांद्वारे होणाऱ्या कुरिअर व पार्सल वाहतुकीचीही आवश्यकतेनुसार तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.
बैठकीला पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश हिवसे, केंद्रीय सेवा व कर विभागाचे अधीक्षक शशांक मंडल, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सुहास सावंत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमन पानगंटीवार यांच्यासह एमआयडीसी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

