google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आरोग्य व शिक्षण

चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय रुग्णालय तातडीने सुरू करा

आ. किशोर जोरगेवारांची विधानसभेत जोरदार मागणी

मुंबई: चंद्रपूर जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या आरोग्यसेवेचा कणा ठरणार्या मासा कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून रुग्णालय सुरू करावे, १५० विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार पदनिर्मिती करावी आणि सर्व रिक्त पदे भरून महाविद्यालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, अशी  मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. चंद्रपूरच्या जनतेच्या आरोग्याचा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा हा प्रश्न असल्याने शासनाने याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.

 

 

अधिवेशनात बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूरच्या जनतेचे अनेक वर्षांचे स्वप्न असलेले मासा कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आज अत्याधुनिक इमारतीसह उभे आहे. शेकडो कोटी रुपये खर्च करून उभारलेली ही वास्तू आणि त्यामधील आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री जिल्ह्याच्या आरोग्यसेवेला नवे बळ देणारी आहे. मात्र काही आवश्यक मूलभूत सुविधा आणि प्रशासकीय बाबी पूर्ण होणे बाकी असल्यामुळे हे रुग्णालय अद्याप जनतेच्या सेवेत पूर्ण क्षमतेने दाखल होऊ शकलेले नाही.

 

ते पुढे म्हणाले की, कोणतेही शासकीय रुग्णालय उभारताना वीज, पाणी, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांची पूर्वतयारी केली जाते. चंद्रपूरमधील या प्रकल्पासाठी अत्याधुनिक इमारत उभारण्यात आली असली तरी पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या सुमारे २१.९६ कोटींच्या निधीची तरतूद अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे रुग्णालय सुरू करण्याच्या प्रक्रियेला विलंब होत असून हा निधी तातडीने मंजूर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

 

आमदार जोरगेवार यांनी वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचाही मुद्दा ठळकपणे मांडला. शासनाने महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची तयारी केली असली तरी त्यानुसार आवश्यक पदनिर्मिती झालेली नाही. सध्या मंजूर असलेली पदसंख्या केवळ १०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार असल्याने प्राध्यापक, विशेषज्ञ डॉक्टर, तांत्रिक कर्मचारी आणि इतर आवश्यक मनुष्यबळाची कमतरता राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार वैद्यकीय शिक्षण मिळण्यासाठी १५० विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार नवीन पदे निर्माण करून सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी त्यांनी केली.

चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळसह पूर्व विदर्भातील हजारो रुग्णांसाठी हे वैद्यकीय महाविद्यालय जीवनदायी ठरणार असल्याचे सांगत आमदार जोरगेवार यांनी शासनाने आवश्यक निधी, मनुष्यबळ आणि सर्व मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून ही अत्याधुनिक आरोग्यसंस्था लवकरात लवकर जनतेच्या सेवेत दाखल करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Share
Back to top button