
चंद्रपूर | २७ जून
महामार्ग पोलीस केंद्र चंद्रपूरच्या सतर्कता आणि तत्परतेमुळे एका हृदयविकाराच्या रुग्णाचे प्राण वाचल्याची घटना आज घडली.
आज (२७ जून) महामार्ग पोलीस केंद्र चंद्रपूरचे पोलीस हवालदार संजय थेरे, पोलीस नाईक राकेश हेडाऊ आणि पोलीस नाईक वकील राठोड हे कोंढा फाटा येथे ‘ऑपरेशन यू-टर्न’ मोहिमेअंतर्गत कर्तव्य बजावत होते.
यावेळी वरोरा येथून चंद्रपूरकडे कारने प्रवास करणारे संकेत गुंजेवार (वय ४०), व्यवसाय – ठेकेदारी, रा. स्नेहनगर, गजानन मंदिर वॉर्ड, चंद्रपूर यांना अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांनी तातडीने महामार्ग पोलिसांकडे मदतीची विनंती केली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस हवालदार संजय थेरे यांनी एमटीए माईन येथील एका कर्मचाऱ्याच्या मदतीने रुग्णाला तात्काळ चंद्रपूर येथील डॉ. वरगंटीवार यांच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या रुग्णावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
डॉ. वरगंटीवार यांनी सांगितले की, रुग्णाला योग्य वेळी रुग्णालयात आणण्यात आल्यामुळे त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले. या तातडीच्या मदतीबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी तसेच डॉक्टरांनी महामार्ग पोलिसांचे मनापासून कौतुक करत आभार व्यक्त केले.

