google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

३५ वर्षांच्या परंपरा खंडीत! सेंट अँनेस शाळेत पालकांना ध्वजारोहणापासून दूर ठेवल्याचा आरोप?

शहर प्रतिनिधी : सरफराज खान पठाण

भद्रावती : सुमठाणा येथील सेंट अँनेस हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात पालकांना उपस्थित राहण्याची संधी न दिल्याचा आरोप करत पालकवर्गाने प्राचार्य मर्सी थॉमस यांच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पालकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या ३५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच पालकांना ध्वजारोहण कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, शाळा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

स्वातंत्र्य दिन हा देशाचा राष्ट्रीय सण असून, अशा कार्यक्रमात पालकांचाही सहभाग असणे ही अनेक वर्षांची परंपरा असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मात्र यंदा पालकांना कार्यक्रमात सहभागी करून न घेतल्याने “३५ वर्षांची परंपरा अचानक का मोडण्यात आली?” असा सवाल संतप्त पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणी प्राचार्य मर्सी थॉमस यांनी पालकांना योग्य स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. पालकांना डावलण्यामागे नेमके कारण काय, याचा खुलासा शाळा प्रशासनाने करावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पालकवर्गात असंतोष वाढत असून, शाळा प्रशासनाकडून समाधानकारक खुलासा न झाल्यास पुढील काळात आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा पालकांकडून देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

३५ वर्षांची परंपरा का मोडली? पालकांना ध्वजारोहणापासून दूर ठेवण्याचे कारण काय? या प्रश्नांची उत्तरे आता सेंट अँनेस हायस्कूल प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.

Share
Back to top button