google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

अहेरी नगरपंचायतीत भ्रष्टाचाराचे आरोप; प्रशासनात खळबळ

अहेरी नगरपंचायतीत काही विभागांचा अतिरिक्त कार्यभार एका अधिकाऱ्याकडे देण्यात आल्याच्या आरोपांमुळे शहरात मोठी चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमुळे नगरपंचायत प्रशासन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, कर अधिकारी यांच्याकडे तांत्रिक पात्रता नसतानाही पाणीपुरवठा, स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत, स्वच्छता आणि कर निर्धारण अशा तब्बल पाच महत्त्वाच्या विभागांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
नगराध्यक्ष रोजा करपे यांनी याबाबत आक्षेप घेतल्याचे सांगितले जात असून, त्यांनी नगरविकास विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल केल्याची चर्चा आहे. “सर्व नियम धाब्यावर बसवून नेमका कोणाचा आशीर्वाद?” असा सवालही सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.

 

दरम्यान, या आरोपांमुळे अहेरी शहरातील राजकीय वातावरण तापले असून नगरपंचायतीच्या कारभारावर जनतेचे लक्ष लागले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रशासनाकडून मात्र अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणाला आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share
Back to top button