google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची हत्या; नीट पेपरफुटीतील आरोपींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा —एन.एस.यु.आय.ची मागणी

चामोर्शी : देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘NEET-UG 2026’ परीक्षा अखेर मंगळवारी रद्द करण्यात आली. ३ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार व पेपरफुटी झाल्याच्या आरोपांनंतर केंद्र सरकारने हा कठोर निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

NEET-UG 2026 परीक्षा झाल्यानंतर पेपर लीक झाल्याची बाब समोर येणे ही अत्यंत गंभीर व संतापजनक घटना असल्याचे एन.एस.यु.आय.च्या वतीने सांगण्यात आले. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात, पालक मोठ्या कष्टाने पैसा खर्च करतात; मात्र अशा प्रकारांमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. पेपरफुटीच्या आरोपांमुळे देशभरात संतापाची लाट पसरली असून परीक्षा रद्द झाल्याची माहिती समजताच वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणातील आरोपींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी एन.एस.यु.आय.ने केली आहे.तसेच, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, NTA बरखास्त करण्यात यावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री Dharmendra Pradhan यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी चामोर्शी प्रशांत घोरुडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी एन.एस.यु.आय.चे जिल्हाध्यक्ष गडचिरोली राहुल वैरागडे, सहसचिव साहिल धोबे, मयुरी कुनघाडकर, अजय भांडेकर, विजय कुनघाडकर तसेच एन.एस.यु.आय.चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Share
Back to top button