राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत
विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबई येथे होणार असल्याचा निर्णय विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या अधिवेशनात राज्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता असून सरकारकडून अनेक महत्त्वाची विधेयके आणि निर्णय मांडले जाणार आहेत.
विधानभवन येथे आयोजित बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध पक्षांचे आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे आणि सतेज पाटील यांनीही बैठकीत सहभाग घेतला.
बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन, संभाव्य विधेयके, प्रश्नोत्तरांचा कालावधी तसेच विविध विभागांशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील पायाभूत सुविधा, शेती, शिक्षण, रोजगार, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर अधिवेशनात सखोल चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या पावसाळी अधिवेशनाकडे राज्यभरातील जनतेचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

