
चंद्रपूर, दि. 31 : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘वॉक फॉर युनिटी’ या पायदळ रॅलीमध्ये चंद्रपूर पोलिस दलासह विविध विभागाचे अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, खेळाडू आदींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. शौर्य, सेवा आणि एकतेचा संदेश देणारी ही रॅली श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधी चौक मार्गे पोलिस मुख्यालयापर्यंत आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात आणि अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या नेतृत्वात सदर रैलीत विविध पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, चंद्रपूर शहरातील वरिष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील व्यवसायिक, विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, विशेषतः एनएसएस व एससीसी कॅटेड आणि विविध समाजसेवी संघटना, योग, नृत्य क्लब आदी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन म्हणाले, चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. लोहपुरुष सरदार वल्लभभाई यांनी देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. तोच वारसा पुढे नेऊन आजच्या विद्यार्थी आणि नागरिकांनी आपला देश एकसंघ ठेवण्याचा संकल्प करावा.
यावेळी उपस्थित शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना एकतेचा, सामूहिक जबाबदारीचा आणि देशहिताचा संदेश देण्यात आला. तसेच सरदार पटेलांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन पोलिस दल आणि समाज यांच्यातील बांधिलकी अधिक दृढ करण्यायाठी मार्गदर्शन करण्यात आले.
सोबतच सायबर गुन्हे व उपाययोजना, मुली व महिलांची सुरक्षितता, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. शेवटी राष्ट्रीय एकतेची शपथ घेऊन पोलिस मुख्यालय परिसरात वृक्षारोपन करण्यात आले आहे. तत्पुर्वी पोलिस मुख्यालय चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचेसुध्दा आयोजन करण्यात आले होते.
 
					 
				 
					 
					
 
					 
					

