NAMASTE योजनेअंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा संपन्न

घुग्घुस /चंद्रपूर:- केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय तसेच केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या नॅशनल ॲक्शन फॉर मॅकेनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम (NAMASTE) योजनेअंतर्गत 16 जुलै 2025 रोजी नमस्ते दिन नगर परिषद, घुग्घुस कार्यालयात साजरा करण्यात आला.
मुख्याधिकारी निलेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता व आरोग्य विभागामार्फत सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये NAMASTE योजनेचे उद्दिष्ट, सांडपाणी व सेप्टिक टँक साफ करणाऱ्या कामगारांची (SSWs) सुरक्षितता, प्रतिष्ठा व स्वच्छता कामात शून्य मृत्यूचा संकल्प या बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यशाळेदरम्यान सफाई कर्मचाऱ्यांना NAMASTE योजनेचे महत्त्व, त्यांचे हक्क, सुरक्षेचे उपाय आणि योजनेअंतर्गत उपलब्ध सुविधा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतला व आपल्या अनुभवांची मांडणीही केली.
या उपक्रमामुळे स्वच्छता कामगारांमध्ये सुरक्षा आणि सन्मानाची भावना दृढ होत असून, शहर स्वच्छतेच्या दृष्टीने NAMASTE योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे.