google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
ताज्या घडामोडी

अवैध सावकारीप्रकरणी 11 जणांवर गुन्हे दाखल

 जनतेला तक्रार दाखल करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 16 : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाने कठोर पावले उचलत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. सदर कायद्यातील कलम 16 अन्वये 11 व्यक्तींविरुद्ध अवैध सावकारीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून आणखी दोन प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे.

याशिवाय, अधिनियमातील नियम 18(2) अंतर्गत सावकाराने कर्जाबदल्यात प्रतिभूती म्हणून बळकावलेली एकूण 6 स्थावर मालमत्ता कर्जदारांना परत देण्याचे आदेश देखील संबंधित प्रकरणांमध्ये पारित करण्यात आले आहेत. ही कार्यवाही सावकारी कायद्यातील तरतुदींनुसार करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी नागरिकांना आवाहन केले की, कोणत्याही अवैध सावकारी प्रकरणासंदर्भात तक्रार असल्यास, त्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर कार्यालयात किंवा तालुका स्तरावरील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून तक्रार दाखल करावी.

अवैध सावकारांच्या विळख्यातून ग्रामीण व शहरी भागातील लोकांची सुटका व्हावी, यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहून अशा अनधिकृत सावकारांविरुद्ध पुढे येणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जे. के. ठाकुर यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button