प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025
शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 07 जुलै : खरीप हंगाम 2025 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2025 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. सदर योजना शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, कीड प्रादुर्भाव, वाऱ्यामुळे नुकसान इत्यादींपासून आर्थिक संरक्षण प्रदान करते.
या योजनेत भात, कापूस, सोयाबीन, तुर, ज्वारी इ. पिकांसाठी विमा संरक्षण दिले जाणार आहे. भात (तांदुळ) करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 61,000 रुपये असून शेतकऱ्यांनी भरायचा हप्ता प्रती हेक्टर 1220 रुपये आहे. तसेच खरीप ज्वारी करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 33,000 रुपये असून विमा हप्ता 82 रुपये 50 पैसे व सोयाबीन करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 58,000 रुपये व विमा हप्ता 580 रुपये. तुर करीता 47,000 रुपये विमा हप्ता 117 रुपये 50 पैसे तसेच कापूस करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 60,000 रुपये व शेतकऱ्यांनी भरायचा विमा हप्ता 1200 रुपये प्रती हेक्टर.
योजनेत सहभागी होण्यासाठी महत्वाचे निकष व अटी: योजना अंतरभूत (Notified) पिके आणि क्षेत्रांवरच लागू असेल, कृषीदार व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी दोघेही पात्र, मात्र भाडेपट्टीचे नोंदणीकृत करार अपलोड करणे बंधनकारक, ई-पीक पाहणी प्रणालीवर पिकांची नोंदणी करणे आवश्यक, शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) असणे बंधनकारक (भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई) (ईमेल: pikvima@aicofindia.com).
योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखा किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्रा’ मार्फत आवश्यक कागदपत्रांसह हप्ता भरावा. सहभागी होण्याची इच्छा नसलेल्या शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी किमान 7 दिवस आधी नकारपत्र संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन पीक संरक्षणासाठी आर्थिक सुरक्षेची हमी घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी / मंडळ कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी / उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर कार्यालय या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.