google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

अंमली पदार्था विरोधात योजनाबद्ध उपाययोजना राबवा – जिल्हाधिकारी विनय गौडा

जनजागृती व नियंत्रणासाठी समन्वयात्मक उपाययोजनांवर भर

चंद्रपूर, दि. 7 जुलै : जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वापर, साठवणूक, वाहतूक व विक्रीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे कठोर आणि योजनाबद्ध उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नार्को-कोऑर्डिनेशन समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत श्री गौडा बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे तसेच रेल्वे पोलिस व इतर विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गौडा यांनी युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये, यासाठी समाजात व्यापक जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शाळा, महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांपासून दूर राहण्यासाठी जनजागृती करावी, तसेच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविण्याचे सांगितले.

अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलिसांच्या सहकार्याने जिल्ह्यातील विविध मेडीकल स्टोअर्सवर अचानक भेटी देऊन प्रतिबंधित औषधांची विक्री होत आहे की नाही याची तपासणी करणे, सीसीटीव्ही कार्यरत आहेत की नाही याचीही खातरजमा करणे, रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ तयार होणार नाहीत याची खबरदारी घेणे, एमआयडीसीमधील चालू व बंद कारखान्यांची तपासणी करणे, तसेच आंतरराज्य सीमेवरील शेती क्षेत्रांमध्ये खसखस किंवा गांजाची लागवड होणार नाही यासाठी कृषी अधिकाऱ्यांकडून नियमित पाहणी करून शेतकऱ्यांना जागरूक करणे, खाजगी वाहनाद्वारे येणाऱ्या टपाल, पार्सल, कुरीअर यांची आकस्मिक तपासणी करणे अशा विविध सूचना देत जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यासोबतच व्यसनमुक्ती संदर्भात महिलांसाठी स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्र उभारण्याचे निर्देश देत, यासाठीही जनजागृतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीचे सादरीकरण पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी केले. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावर नियमित पाठपुरावा करण्याचेही सूचित केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button