पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा त्रीशताब्दी जयंती निमित्त चंद्रपुरात निघणार शोभा यात्रा
३१ मे ला होणाऱ्या शुभारंभ सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे डॉ मंगेश गुलवाडे यांचे आव्हान
चंद्रपूर :- यंदाचे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे आहे. या शुभपर्वाचे औचित्य साधून त्यांच्या महत्कार्याची जाणीव जागृती व्हावी यासाठी चंद्रपूर येथील त्रिशताब्दीय जयंती समारोह नागरी समितीच्या वतीने यंदा वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ येत्या 31 मे रोजी शोभायात्रेने होणार असून, त्यानंतर महोत्सवाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते, तर शिवशंभू विचार मंचाचे संयोजक सुधीर थोरात यांच्या विशेष उपस्थितीत होईल, अशी माहिती समितीच्या वतीने पत्रपरिषदेत देण्यात आली.
शुक्रवार, 31 मे रोजी सायंकाळी 5 वाजता येथील गांधी चौकातून भव्य शोभायात्रा निघेल. यात्रेत पारंपारिक नृत्य, ढोल ताशे आणि लेझिम पथकासह विविध देखावे राहतील. या भव्य शोभायात्रेचा समारोप येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाच्या परिसरात होईल. सायंकाळी 7 वाजता याच सभागृहात महोत्सवाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार असून, डॉ. प्रशांत बोकारे, सुधीर थोरात यांच्यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरी समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे व अन्य मान्यवर उपस्थितीत राहतील.
आपल्या दैदीप्यमान जीवनकायनि स्त्री जन्माची महानता सिध्द करणाऱ्या, भारताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या प्रजाहितदक्ष न्यायप्रिय राज्यकर्त्या, राजमाता, लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाची सार्थकता या महोत्सवातून विशद होणार आहे. हा त्रिशताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी समितीचे गठण करण्यात आले असून, त्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल, असेही यावेळी सांगण्यात आले.
पत्रपरिषदेला तुषारजी देवपुजारी, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. राजेश इंगोले, कैलास उराडे आदी मान्यवरांनी संबोधित केले.
2 जून रोजी भव्य रक्तदान शिबीर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने येत्या 2 जून रोजी येथील आयएमए सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. हा त्रिशताब्दी महोत्सव असल्याने 300 जणांचे रक्तदान यावेळी होणार असल्याचेही सांगण्यात आले.