google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक

चंद्रपूर:-  चंद्रपूर जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, महानगर पालिकेचे उपायुक्त संदिप चिद्रवार, परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे, पोलीस निरिक्षक (वाहतूक प्रविण पाटील), शिक्षणाधिकारी प्राथमिक/ माध्यमिक यांचे प्रतिनिधी, सर्व तालुक्यातील शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य / मुख्याध्यापक व त्यांचे प्रतिनिधी, स्कूल बस संघटनेचे प्रतिनिधी, ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये सर्व स्कुल बसधारकांना व संबंधित शाळा व्यवस्थापन यांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आल्या.
स्कूल बस मालकाने सुट्टीच्या कालावधीमध्ये सर्व स्कूल बस वाहनाचे मेन्टनन्स करावे. फिटनेस मुदतीत असेल तरी वाहन तपासणीसाठी आरटीओ कार्यालयाकडे सादर करावे. त्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये तपासणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. प्रत्येक स्कूल बसला सीसीटीव्ही लावावेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिका-यांच्या माध्यमातून पब्लिक ट्रान्सपोर्टने किती विद्यार्थी येतात, याबाबतची माहिती वाहतूक शाखा तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडे सादर करावी.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता, बस थांब्यावर बस थांबविण्यात यावे, वाहनांचे मेन्टनन्स नियमित करावे, वाहनाचे पार्किंग योग्य ठिकाणी करावे. बस चालकाने मद्यपान करून वाहन चालवु नये, आसनक्षमतेचे उल्लंघन करू नये, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूलबस नियमावलींचे काटेकोरपणे पालन करावे, मुलींची वाहतूक करणाऱ्या बसमध्ये महिला मदतनिस असणे बंधनकारक आहे. सर्व शाळांनी शालेय परिवहन समितीची स्थापना करून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेची खात्री करावी. अनाधिकृत ऑटोमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये,
विद्यार्थ्यांच्या सुरक्षा विषयक काही सुचना गोपनियरित्या घ्यावयाच्या असल्यास वाहतूक पोलीस निरिक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस अधिक्षक यांना देऊ शकतात. अशा व्यक्तिचे नाव गुप्त ठेवण्यात येइल, असे पोलिस अधिक्षक यांनी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button