महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्षांची मोरवा विमानतळास भेट

चंद्रपूर, दि. 24 : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (MADC) च्या उपाध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी नुकतीच चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाला भेट दिली. नागपूर फ्लाइंग क्लबने आपला फ्लाइंग सेक्शन प्रशिक्षणासाठी अलीकडेच या ठिकाणी स्थलांतरित केल्याने सदर भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
मोरवा विमानतळ हे MADC च्या मालकीचे असून, नागपूर फ्लाइंग क्लबला विमान उड्डाण प्रशिक्षणासाठी सुपूर्त करण्यात आले आहे. सौ. पांडे यांचा दौरा या प्रशिक्षण केंद्रातील उपलब्ध पायाभूत सुविधा, तांत्रिक गरजा व भविष्यातील विकास संधींचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सौ. पांडे यांनी प्रशिक्षणार्थी कॅडेट्सशी संवाद साधत प्रत्यक्ष प्रशिक्षण अनुभव जाणून घेतला आणि त्यांच्या अडचणी व अपेक्षांचा देखील आढावा घेतला. तसेच नागपूर फ्लाइंग क्लबचे व्यवस्थापकीय संचालक तेजू सिंग पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षण उपक्रमांची माहिती व भविष्यातील योजना जाणून घेतल्या.
राज्यातील विमान प्रशिक्षण क्षेत्रात दर्जात्मक प्रगती साधण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या दृढ संकल्पनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी सातत्याने प्रयत्नशील आहे. विमान प्रशिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्याचा अग्रगण्य स्थान प्राप्त व्हावे, या उद्देशाने स्वाती पांडे यांची ही भेट महत्त्वपूर्ण ठरली आहे.