google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

भद्रावती ऑटोरिक्षा असोसिएशनमध्ये भाजप महिला आघाडीचा अनोखा रक्षाबंधन सोहळा

ऑटोचालक बांधवांना राखी बांधून दिला सामाजिक सलोखा व सुरक्षिततेचा संदेश

शहर प्रतिनिधी : सरफराज खान पठाण

भद्रावती : रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नव्हे, तर परस्पर विश्वास, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा दिवस आहे. याच भावनेतून भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने भद्रावती ऑटोरिक्षा असोसिएशनमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले.

 

या कार्यक्रमात महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ऑटोरिक्षा चालक बांधवांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले तसेच त्यांच्या दीर्घायुष्याची आणि सुख-समृद्धीची प्रार्थना केली. दररोज शहरातील नागरिक, महिला आणि मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थळी पोहोचविणाऱ्या ऑटोचालकांना भाऊ मानून रक्षाबंधन साजरे करण्यात आल्याने या उपक्रमाला विशेष सामाजिक महत्त्व प्राप्त झाले.

 

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महामंत्री वंदना सिन्हा, महिला आघाडीच्या अध्यक्षा वृषाली पांढरे, उपाध्यक्षा डिम्पल गुरनुले, भद्रावती शहर महामंत्री अर्चना खंडाळे, तसेच ममता राजभर, सुनीता कामटकर, सोनम भोस्कर, प्रभा मिंदा आणि माधुरी ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा वृषाली पांढरे म्हणाल्या की, “रक्षाबंधन हा केवळ रक्ताच्या नात्याचा सण नाही, तर विश्वास, सामाजिक सलोखा आणि सुरक्षेचे बंधन मजबूत करणारा सण आहे. ऑटोचालक बांधव दररोज आपल्या बहिणी-मुलींना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना राखी बांधणे हा आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.”

कार्यक्रमाला भद्रावती ऑटोरिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष बाळूभाऊ उपलंचीवार, कोषाध्यक्ष प्रकाश मेंढे, कार्यकारिणी सदस्य गणेश गझलेकर, रमेश पाटील, बबलू पठाण, तसेच सदस्य किशोर भागवत आणि गणेश पेटकर यांच्यासह मोठ्या संख्येने ऑटोचालक उपस्थित होते.

राखी बांधल्यानंतर ऑटोचालक बांधवांनीही महिला भगिनींच्या सुरक्षिततेला सदैव प्राधान्य देत त्यांच्या रक्षणासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला. या भावनिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रमामुळे महिला आघाडी व ऑटोरिक्षा चालकांमधील आपुलकीचे नाते अधिक दृढ झाले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने साजरा करण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक ऐक्य, परस्पर विश्वास आणि महिला सुरक्षेचा सकारात्मक संदेश देणारा ठरला.

Share
Back to top button