चंद्रपूरला नवी एमआयडीसी मिळणार? आ. किशोर जोरगेवारांची मोठी मागणी

चंद्रपूर : चंद्रपूरच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळावी, नवीन उद्योगांना चालना मिळून स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी नवीन एमआयडीसीसाठी जागा निश्चित करणे, उद्योगांना तातडीने भूखंड उपलब्ध करून देणे तसेच औद्योगिक विस्ताराला गती देण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण मागण्या आमदार किशोर जोरगेवार यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी (विदर्भ) अजित कुंभार यांच्याकडे केल्या.
आज, गुरुवारी एमआयडीसी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी (विदर्भ) अजित कुंभार यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी या मागण्या मांडल्या. तसेच, या संदर्भातील निवेदनही त्यांनी अजित कुंभार यांना सादर केले.
बैठकीत आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूरच्या औद्योगिक क्षमतेचा उल्लेख करत जिल्ह्यात नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी पुरेशी व योग्य जागा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. चंद्रपूर परिसराचे भौगोलिक स्थान, रेल्वे व रस्ते दळणवळणाची सुविधा तसेच औद्योगिकदृष्ट्या असलेली क्षमता लक्षात घेता, भविष्यात मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी विस्तीर्ण भूखंडांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी एमआयडीसीने महसूल विभागाशी समन्वय साधून तातडीने सर्वेक्षण करावे, नवीन औद्योगिक वसाहतीसाठी योग्य जागा निश्चित करून ती अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह प्रकल्पामुळे विदर्भात निर्माण झालेल्या औद्योगिक संधींचाही उल्लेख केला. या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये लोहखनिजावर आधारित उद्योग, स्टील उद्योग तसेच अनुषंगिक उद्योग सुरू करण्यासाठी अनेक उद्योजक उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. शासन स्तरावरही या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू असल्याने, जिल्ह्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय विलंब न करता प्राधान्याने भूखंड उपलब्ध करून देण्याचे धोरण राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
नवीन उद्योग चंद्रपूरमध्ये स्थापन झाल्यास हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आणि जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल, असेही आमदार जोरगेवार यांनी बैठकीत नमूद केले.
यावेळी सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांनी मांडलेल्या मागण्यांची सकारात्मक दखल घेत संबंधित विषयांचा अभ्यास करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. चंद्रपूरच्या औद्योगिक विकासासाठी शासन आणि एमआयडीसी स्तरावर समन्वयाने काम करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

