चौकात धारदार शस्त्रासह दहशत माजवणारा आरोपी जेरबंद; चंद्रपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

चंद्रपूर, दि. १६ जुलै २०२६ : चंद्रपूर शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमाला अटक केली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कामगार चौक परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिवशंकर उर्फ भोला विजयपाल सिंह (वय ४२) असे असून, तो कामगार चौक परिसरात हातात धारदार शस्त्र घेऊन आरडाओरडा करत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत होता. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र डी.बी. पथकाने त्याला तात्काळ ताब्यात घेतले.
आरोपीकडून सुमारे १५.५ इंच लांबीचे लोखंडी धारदार शस्त्र जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे ₹७०० आहे. याप्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

