घुग्घुस पोलिसांची स्तुत्य कामगिरी : दोन महिन्यांपूर्वी सापडलेली मनोरुग्ण महिला आता ठणठणीत, श्रद्धा फाउंडेशन नागपूरने नातेवाइकांच्या ताब्यात दिली

घुग्घुस, चंद्रपूर : दोन महिन्यांपूर्वी घुग्घुस बस स्टॉपजवळ एक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ महिला बेवारस अवस्थेत आढळून आली होती. सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन घुग्घुस पोलिस ठाण्याचे तत्कालीन एपीआय योगेश पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई करत त्या महिलेला नागपूर येथील श्रद्धा फाउंडेशनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.
संस्थेने महिलेला वेळेत योग्य उपचार दिले असून, आता तिची मानसिक प्रकृती पूर्वीपेक्षा खूपच सुधारली आहे. उपचारानंतर श्रद्धा फाउंडेशनने महिलेच्या नातेवाइकांचा शोध घेऊन त्यांना संपर्क साधला व संबंधित महिलेला त्यांच्या स्वाधीन केले.
या संपूर्ण प्रकरणात श्रद्धा फाउंडेशन, नागपूर यांनी दाखवलेली सेवा व समर्पण खरोखरच कौतुकास्पद आहे. वेळेवर उपचार झाल्यामुळे महिलेला नवजीवन मिळाले असून ती पुन्हा आपल्या कुटुंबाशी एकत्र झाली आहे.
घुग्घुस पोलिस ठाणे आणि श्रद्धा फाउंडेशनच्या या मानवतावादी कार्याबद्दल स्थानिक नागरिकांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत.