google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

जिल्हाधिका-यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

शहरातील अब्दुल कलाम आझाद गार्डन येथे 22 जुलैपर्यंत आयोजन

चंद्रपूर, दि. 18 : आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्यावतीने शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन येथे 18 ते 22 जुलै या कालावधीत रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज (दि.18) जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ, विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, पारंपरिक ग्रामीण आहाराचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या रानभाज्यांचे सेवन आरोग्यास अत्यंत उपयुक्त ठरते. या महोत्सवाचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रकल्प अधिकारी श्री. राचेलवार म्हणाले, नागरिकांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने प्रथमताच रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जंगलातील या भाज्यांमुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. या महोत्सवात रानातील 25 ते 30 प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आदिवासी बांधवांकडून रानभाज्यांचा उपयोग करून तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे स्टॉलसुध्दा येथे लावण्यात आले आहे. पाच दिवसीय या महोत्सवाचा शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी कुटुंबासह लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

रानभाज्या या जंगल, डोंगराळ भाग, शेतकाठ, माळरान याठिकाणी नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या वनस्पती असून त्या खाण्यायोग्य असतात. या भाज्यांमध्ये उच्च पोषणमूल्ये, औषधी गुणधर्म, तसेच स्थानिक सांस्कृतिक परंपरेचा वारसा असून ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या दैनंदिन आहारात या भाज्यांचा समावेश करून सुदृढ आरोग्य राखले आहे.

चंद्रपूर जिल्हा जैवविविधतेने समृद्ध असून येथे अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत. यामध्ये कंदभाज्यांमध्ये करांदे, कणगर, कडुकंद, कानबाई, अळू यांचा समावेश आहे. हिरव्या भाज्यांमध्ये तांदुळजा, काठमाठ, कुडा, टाकळा, कोहळा, कुई, पोळ, कवळा, लोथा, तर फळभाज्यांमध्ये कर्टोली, वाघेडा, चीचुडी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड, तसेच फुलभाज्यांमध्ये कुडा, शेवळ, उळशी, तरोटा, कुडवाच्या शेंगा आदींचा समावेश आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button