सजग यंत्रणेमुळे बालविवाह रोखण्यात यश

चंद्रपूर, दि. 17 : बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक समस्येवर रोख बसवण्यासाठी जिल्हा प्रशासन, महिला व बाल विकास विभाग आणि चाईल्ड हेल्पलाईन यांचे संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, चंद्रपूर शहरात एका अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह थांबवण्यात आला आहे.
चाईल्ड हेल्प लाईन 1098 आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एका 17 वर्ष 2 महिन्यांच्या बालिकेचा विवाह दिनांक 7 जुलै 2025 रोजी नियोजित होता. या माहितीच्या आधारे दिनांक 4 जुलै 2025 रोजी त्वरित पावले उचलण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर व जिल्हा चाईल्ड लाईन प्रकल्प समन्वयक अभिषेक मोहूर्ले यांच्या मार्गदर्शनात केस वर्कर अंकुश उराडे व किरण बोहरा यांनी संबंधित बालिकेच्या घरी भेट दिली. त्यांनी जन्मदाखला व आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली असता मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार, मुलीचे विवाहवेळी किमान वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. याबाबत बालिकेच्या कुटुंबीयांना समज दिली गेली तसेच बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. या समुपदेशनामुळे नियोजित विवाह थांबवण्यात यश आले. यानंतर बालिकेला पालकांसह बाल कल्याण समिती, चंद्रपूर समोर समुपदेशनासाठी उपस्थित करण्यात आले.
जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून अशा घटनांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी सजग राहून अशा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ चाईल्ड हेल्प लाईन 1098 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे..