चंद्रपूर जिल्हा पोलिस मध्ये झालेल्या बदल्या चर्चेत

चंद्रपूर जिल्हा पोलिस दल नुकताच झालेल्या बदली सत्राने चांगलेच चर्चेत आले असून एकीकडे जिल्ह्यातील तीन महिला ठाणेदारांची अल्पावधीत दुसऱ्या ठिकाणी करण्यात आलेली बदली तर दुसरीकडे काही वादग्रस्त ठरलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या हाती ठाणेदार पदाचे सूत्र दिल्याने जिल्हा पोलिस दलातील पारदर्शकतेचे निकष कोणते याचीच चर्चा आता चर्चा सुरू झाली आहे.
चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांची चंद्रपूर येथील भरोसा सेलमध्ये बदली करण्यात आली. त्यांनी चंद्रपूर शहर ठाण्याचा प्रभार घेतल्यापासून अवघ्या 15 महिन्यात त्यांची बदली करण्यात आली आहे.
भद्रावती पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक लता वाढीवे यांची चंद्रपूर येथील सायबर सेलमध्ये बदली झाली. त्यांनी दुर्गापूर येथून चार महिन्यापूर्वीच भद्रावती येथे बदली करण्यात आली होती अवघ्या चार महिन्यात त्यांना ठाणेदार पदावरून काढण्यात आले. तळोधी बा. पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस निरीक्षक संगीता हेलोंडे यांचीही 10 महिन्यात बदली करण्यात आली असून त्यांना वरोरा पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यात असलेल्या या तीन महिला ठाणेदारांची अल्पकालावधीत बदली करण्यात आल्यानंतर पोलिस दलात चर्चांना पेव फुटले. नव्या बदल्यांमध्ये जिल्ह्यात एकाही ठिकाणी महिला ठाणेदार देण्यात आले नव्हते याची चर्चा सुरू होताच राजुरा पोलिस ठाण्यातील एपीआय निशा भुते यांना लाठी येथील उपपोलिस ठाण्याची कमान सोपवून पोलिस दलाची प्रमिता संवर्धन करण्याचा खटाटोप करण्यात आला.
जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील उपपोलिस ठाण्याची कमान महिला एपीआयच्या हाती तर ज्यांच्या कार्यकाळ वादग्रस्त ठरले त्या पोलिस निरीक्षकांना ठाणेदार पद बहाल करण्यात आल्यामुळे नुकत्याच झालेल्या पोलिस दलातील बदल्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.(साभार)