google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

ऊर्जानगर विकासाला नवी गती; मुनगंटीवारांच्या डीपीआर मागणीला महानिर्मितीची हिरवी झेंडी!

चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीचे सर्वांगीण आधुनिकीकरण करून तेथील नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आणि सर्वसमावेशक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे.

 

याच अनुषंगाने त्यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन ऊर्जानगर वसाहतीच्या विकासासाठी आवश्यक विविध कामांचा समावेश असलेला सर्वंकष विकास आराखडा (डीपीआर) तातडीने तयार करून त्यास आवश्यक प्रशासकीय मान्यता व कार्यवाही गतीमान करण्याची मागणी करणारे सविस्तर निवेदन सादर केले. आ. मुनगंटीवार यांनी दिलेल्या निवेदनात ऊर्जानगर वसाहतीतील रस्त्यांचे आधुनिकीकरण, नवीन शासकीय निवासस्थाने, हरित क्षेत्रांचा विकास, क्रीडा व आरोग्य सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा, महिला बचत गटांसाठी उद्योग भवन, आधुनिक बाजारहाट संकुल आदी महत्त्वपूर्ण विकासकामांचा डीपीआरमध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आली.

 

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ऊर्जानगर वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वंकष डीपीआर तयार करून विकासकामांना गती देण्याचा आग्रह धरला. त्यावर महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांनी मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत, यासंदर्भात गांभीर्याने दखल घेत आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले.

 

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे चंद्रपूर शहराचा चेहरा-मोहरा बदलला असून, शहराने विकासाची नवी ओळख निर्माण केली आहे. चंद्रपूरच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी ते आजही सातत्याने कटिबद्ध असून, विविध विकास प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी मंत्रालयापासून ते संबंधित विभागांपर्यंत सातत्याने पाठपुरावा करत आहेत. ऊर्जानगर वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठीही त्यांनी घेतलेल्या पुढाकाराला महानिर्मितीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याला लवकरच गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share
Back to top button