बोगस EWS प्रमाणपत्रांमुळे पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय?
शिक्षण व नोकरी प्रक्रियेवर परिणाम होत असल्याची नागरिकांची तक्रार

जी. प्र. गडचिरोली: चंद्रपूर जिल्ह्यासह अनेक भागांत बोगस EWS (इकॉनॉमिकॅली वेअकर सेकशन ) प्रमाणपत्रांचा वापर होत असल्याची चर्चा रंगू लागली असून यामुळे खऱ्या पात्र विद्यार्थ्यांवर व नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती चुकीची कागदपत्रे सादर करून EWS प्रमाणपत्र मिळवत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही काही लोक बनावट माहितीच्या आधारे EWS आरक्षणाचा लाभ घेत असल्यामुळे गरीब व पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणातील प्रवेश तसेच शासकीय नोकरीच्या संधी गमवाव्या लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे EWS आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाने लागू केले आहे. मात्र कथित बोगस प्रमाणपत्रांमुळे संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया प्रभावी नसल्याने गैरप्रकार वाढत असल्याचीही चर्चा आहे.
विद्यार्थी व पालकांनी प्रशासनाने EWS प्रमाणपत्रांची काटेकोर चौकशी करावी, चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच पडताळणी प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, संबंधित विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसली तरी या प्रकरणामुळे शिक्षण व रोजगार क्षेत्रात गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

