जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व सिलिंडरचा मुबलक साठा
7.05 लक्ष लिटर पेट्रोल, 5.93 लक्ष लिटर डिझेल तर 6774 सिलिंडर उपलब्ध

पालकमंत्र्यांनी घेतली पेट्रोलपंप आणि गॅस एजन्सी मालकांची बैठक
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 28 : आखाती युध्दाच्या पार्श्वभुमीवर पेट्रोलियम पदार्थ व इंधन पुरवठ्याबाबत अफवांचे पीक आले आहे. मात्र नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. आजघडीला जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचा साठा मुबलक प्रमाणात असून 7 लक्ष 5 हजार 861 लिटर पेट्रोल, 5 लक्ष 93 हजार 892 लिटर डिझेल आणि 6774 घरगुती वापराचे सिलिंडर जिल्ह्यात उपलब्ध आहे. तसेच कंपन्यांकडून याचा पुरवठा देखील नियमित होत असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोलपंपधारक, गॅस एजन्सीचे मालक आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत पालकमंत्री डॉ. वुईके यांनी आढावा बैठक घेऊन जिल्ह्याची परिस्थिती जाणून घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर यांच्यासह पेट्रोलपंप आणि गॅस एजन्सीधारक उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, पेट्रोल पंपावर पेट्रोल – डिझेलचा साठा उपलब्ध असून पेट्रोलियम कंपन्यांकडून पुरवठा नियमित सुरू आहे. व्यावसायिक सिलिंडर पुरवठ्याबाबत थोडी अडचण असली घरगुती गॅस सिलिंडरसुध्दा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पेट्रोलपंप आणि गॅस एजन्सीधारकांनी रोजचा आपल्याकडे किती साठा उपलब्ध आहे, त्याची माहिती प्रशासनाला द्यावी. सिलिंडर डिलिव्हरी करणा-यांकडून अपप्रचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एजन्सीधारकांनी आपापल्या स्टॉफच्या माध्यमातून नियमित पुरवठ्याबाबत सकारात्मक संदेश घरोघरी ग्राहकांपर्यंत पोहचवावा. प्रथम बुकिंग करणा-यांना तारखेनुसार सिलिंडर वाटप सुरू आहे. कुठेही टंचाई नाही. क्रमानुसार बुकिंग करणा-यांना सिलिंडरचे वाटप करण्यात येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी संयम ठेवावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासन-प्रशासन आणि पेट्रोलपंप तसेच गॅस एजन्सीधारकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 146 पेट्रोल पंप असून यात 35 एचपीसीएल कंपनीचे, 46 बीपीसीएल, 45 आयओसीएल आणि इतर 20 पेट्रोलपंप यांचा समावेश आहे. आजघडीला (दि. 28) चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोलचा एकूण साठा 9 लक्ष 31 हजार 991 लिटर असून त्यापैकी 2 लक्ष 26 हजार 130 लिटर पेट्रोलची विक्री झाली तर 7 लक्ष 5 हजार 861 लिटर पेट्रोल उपलब्ध आहे. डिझेलचा एकूण साठा 9 लक्ष 76 हजार 927 असून यापैकी 3 लक्ष 83 हजार 35 लिटर डिझेलची विक्री झाली. तर 5 लक्ष 93 हजार 892 लिटर डिझेलचा साठा उपलब्ध आहे.
जिल्ह्यात घरगुती गॅस कनेक्शनची एकूण संख्या 6 लक्ष 49 हजार 313 आहे. यात एचपीसीएल कंपनीचे 1 लक्ष 46 हजार 514 ग्राहक, आयओसीएल कंपनीचे 4 लक्ष 39 हजार 282 ग्राहक तर बीपीसीएल कंपनीचे 63 हजार 517 ग्राहक आहेत. जिल्ह्यात एकूण सिलिंडरचा साठा 14 हजार 352 असून त्यापैकी 7578 सिलिंडरचे वाटप तर 6774 सिलिंडर साठा उपलब्ध आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून नियमितपणे पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडर जिल्ह्यासाठी उपलब्ध होत आहे.

